- १५ तज्ज्ञ डॉक्टरांची फौज; आसीयूमधील बेडही आरक्षित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. मे. २०२१) :- म्युकर मायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, पिंपरी – चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) या ठिकाणी या रोगाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
वायसीएममध्ये रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आला आहे. नवी सांगवी येथील जिल्हासर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी ८६ बेड आरक्षित आहेत. म्युकर मायकोसिस आजाराच्या रुग्णांवर अद्यापि स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नाही. मात्र कोविडसाठी आरक्षित असणाऱ्या बेडवरच रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या रुग्णालयात आतापर्यंत ५ रुग्णांनी उपचार घेतले असून ते बरे झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
रुग्णांची वाढती संख्या पाहता या आजारासाठी स्वतंत्र वार्ड करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात म्युकर मायकोसिसवरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी ६० बेडचे दोन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. सुमारे १५ तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत. या बरोबरच आसीयूमधील बेड या आजाराच्या रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.
















