- पोलिसांची पिंपरी बाजारपेठेत कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. मे. २०२१) :- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर निर्बंध लावले आहेत. तरीही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा देखील उगारण्यात येत आहे, असे असतानाही बेशिस्त नागरिकांची बेफिकीरी कमी होताना दिसून येत नाही.
त्यामुळे पोलिसांकडून पिंपरी बाजारपेठ परिसरात अँटीजन तपासणीचे शिबिर घेण्यात आले. मंगळवारी व बुधवारी हे शिबिर झाले. शगुन चौकात झालेल्या शिबिरात सामान्य नागरिकांची तपासणी करण्यात आली. महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील वैद्यकीय विभागाच्या पथकाने ही तपासणी केली.
विनाकारण फिरणा-या २७० नागरिकांची अँटीजन तपासणी करण्यात आली. यात सर्वांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले . परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे आदी या वेळी उपस्थित होते.
पिपरी कॅम्पात गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाचा संसर्ग रोखण्याबाबत जनजागृती केली जात आहे. तसेच नागरिकांच्या कोरोना तपासणीचे शिबिर घेण्यात येत आहेत
– मिलिंद वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.
















