- दिवसाढवळ्या इंद्रायणी नदीपात्रात कचऱ्याची लावली जातेय विल्हेवाट..
- समाजकंटकाविरोधात कारवाईची स्वी. नगरसदस्य दिनेश यादवांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. मे. २०२१) :- तळवडे व चिखलीच्या शिवेवर असणाऱ्या इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला व जाळला जातोय. त्यामुळे हवेचे प्रदूषण होतेय. जळणाऱ्या कचऱ्यातुन येणाऱ्या धुरामुळे आजुबाजुच्या नागरिकांना श्वसनाचा त्रास उद्भवला आहे. कचरा जळणाऱ्या व नदीप्रदूषित करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ‘फ’ प्रभागाचे स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी पालिकेच्या पर्यावरण विभागाकडे केली आहे.
यादव म्हणाले की, तळवडे व चिखलीच्या शिवेवर असणाऱ्या इंद्रायणी नदीपात्र व परिसरात प्लास्टिक, रबर, ऑईल, कपडे अशा वस्तू जाळल्या जातात. रात्रीच्या वेळी ट्रक, टेम्पो, टँक्टरने तळवडे मार्गे शेलारवस्तीपुढील खाणीच्या रस्त्याने नदीपात्रात कचरा टाकला जातो आहे.
काही दिवसांनी पावसाळा सुरू होईल. नदीचे पाणी प्रदुषित होईल. पाणी प्रदुषित झाल्यावर जलपर्णी, गढुळ पाणी, पाण्याला फेस येणे, पाण्यातील जलचरांचा ऱ्हास होईल. त्यामुळे पालिकेच्या पर्यावरण विभागाने त्वरेने पाऊले उचलावीत व नदी प्रदूषित करणाऱ्या समाजकंटकाविरोधात कारवाई करावी.
स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांच्यासह स्थानिक नागरिक भाऊसाहेब रोकडे, विजय तापकीर, अमर लोंढे आदींनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे.


















