- जम्बो देखील १० तारखेला बंद होणार; रुग्णसंख्या घटल्याने आयुक्तांचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने चिंचवडमधील ऑटो क्लस्टर रुग्णालय सोमवारी (दि. ३१) बंद केले. नेहरूनगरच्या जम्बो रुग्णालयात केवळ १०० रुग्ण दाखल असून, येत्या १० जूनला ते बंद करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्यास हे रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
सध्या दररोज ५०० च्या आत दैनंदिन रुग्णसंख्या आहे. त्यामुळे पालिकेच्या ५ रुग्णालयांसह खासगी १३६ रुग्णालयांतील रुग्णसंख्या झपाट्याने घटली आहे. ही शहरासाठी दिलासादायक बाब आहे. ऑटो क्लस्टा रुग्णालयात रविवारी (दि. ३०) केवळ एक रूग्ण दाखल होता. सोमवारी एकही रुग्ण नसल्याने २०० ऑक्सिजन बेड क्षमतेचे ऑटो क्लस्टर रुग्णालय बंद करण्याचा निर्णय आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला.
त्यानुसार सोमवारी रुग्णालयास टाळे लावण्यात आले. त्यामुळे तेथील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी व इतर आवश्यक मनुष्यबळाचे काम थांबविण्यात आले आहे. ८०० ऑक्सिजन बेडची क्षमता असलेल्या जम्बो रुग्णालयात रुग्णांना प्रवेश देणे पूर्वीच बंद केले आहे. तेथे सध्या केवळ १०० जण दाखल आहेत. येत्या १० तारखेस हे रुग्णालयही बंद करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.


















