- मोकळ्या जागेत औद्योगिक कचरा टाकल्या प्रकरणी कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. जून. २०२१) :- चिखलीतील न्यू महाराष्ट्र अॅल्युनियम या कंपनीकडून कास्टिंग पावडरची अनेक पोती व औद्योगिक कचरा उघड्यावर टाकून दिल्याने त्यास आग लागून परिसरात धूर व उग्र वास पसरला होता. वायू प्रदूषणामुळे रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यासंदर्भात महापालिकेस तक्रार केल्यानंतर पर्यावरण विभागाने औद्योगिक कचरा उघड्यावर टाकणाऱ्या संबंधित कंपनीवर कारवाई करत त्याचे गोदाम मंगळवारी (दि. ८) सील केले. पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे.
कंपनीच्या गोदामात कास्टिंग पावडरचा साठा करण्यात आला होता. त्या पावडरचे पोती व इतर साहित्य चिखली स्पाईन रस्ता येथील नक्षत्र सोसायटी शेजारच्या मोकळ्या जागेत टाकले जात होते. औद्योगिक कचरा पेट घेऊन आग लागल्याने धूर व अमोनिया वायुचा उग्र वास येत होता. डोळ्याची जळजळ होणे, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास आदी प्रकार परिसरातील रहिवाशांना होत होते. तेथील आग अग्निशामक विभागाने दोन वेळा विझविली. मात्र तो कचरा पुन्हा पेटत होता.
त्या संदर्भात स्थानिक नगरसेवक एकनाथ पवार यांच्याकडे रहिवाशांनी तक्रार केली. त्यांनी तत्काळ त्या जागेची पाहणी करून पर्यावरण विभागाकडे तक्रार केली. त्यांना घटनास्थळी बोलावून घेऊन संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी व त्यांच्या पथकाने चिखली येथील न्यू महाराष्ट्र अॅल्युनियम या कंपनीच्या गोदामास सील ठोकून कारवाई केली. तसेच, पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.
स्पाईन रस्त्यावर सोसायटीच्या शेजारील प्राधिकरण्याचा मोकळ्या जागेत औद्योगिक कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेतला असता, ते चिखली येथील न्यू महाराष्ट्र अॅल्युनियम येथील असल्याचे पाहणीत निर्देशनात आले. त्यानुसार त्याचे गोदाम सील केले आहे. कंपनीच्या मालक किंवा प्रतिनिधींवर बुधवारी (दि. ९) गुन्हा नोंदविला जाणार आहे.
– संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग…