- आरोपींनी हातातील कोयते भिरकावले; नागरिक दहशतीखाली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून. २०२१) :-आरोपी हे संगनमत करून हातात कोयते, सिमेंटचे गट्टू, फरशीचे तुकडे घेऊन आरडाओरडा करीत आले. मोहननगर आमचे आहे, आम्हाला सर्वांनी दादा म्हणायचं, कोणाची हिम्मत असेल तर आमच्या समोर येऊन दाखवा, त्याचा मुडदाच पाडतो, असे म्हणून हातातील हत्यारे फिरवत दहशत निर्माण केली.
गल्लीतील लोकांच्या दारासमोर असलेल्या प्लास्टीक ड्रमवर कोयता व सिमेंटच्या गट्टूने मारून तोडफोड केली. त्यांच्या दहशतीला घाबरून लोकांनी दरवाजे खिडक्या बंद केल्या. त्यावेळी फिर्यादी टकले घराबाहेर उभे असताना आरोपी त्यांच्याजवळ आले. शिवीगाळ करीत तू बाहेर थांबतोय का, थांब तुला खल्लासच करून टाकतो, असे म्हणत फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर कोयत्याने वार केला. मात्र त्यांनी तो वार चुकविल्याने कोयता घराच्या दरवाजावर बसला. दत्तनगर, चिंचवड परिसरात मंगळवारी (दि. ८) सायंकाळी ही घटना घडली.
पहिल्या प्रकरणात प्रशांत रघुनाथ टकले (वय २३, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. राहूल कांबळे, मुकुल कांबळे, सोन्या कांबळे, सुशांत ऊर्फ दाद्या शिंदे, मोहसीन शेख, स्वप्नील कांबळे, रूषीकेश महारनोर, नवनाथ शिंदे, सोहम सरोदे, सुजल सूर्यवंशी, यश गरड, राहूल कसबे, सौरभ भालेराव, ओंकार शिंदे, नीलेश उजगरे, राजूल शेलार आणि इतर (सर्व रा. दत्तनगर, चिंचवड), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यानुसार आरोपींच्या विरोधात खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी घराबाहेर उभे असताना आरोपींनी संगनमत करून आरडाओरडा करून शिवीगाळ केली. आमच्या भावावर गुन्हे दाखल करताय काय, आता कोणात दम असेल तर बाहेर या. एकाएकाला रस्त्यात आडवा पाडून उभा चिरतो, असे म्हणत लोकांच्या घराबाहेर ठेवलेल्या ड्रमवर कोयते मारून नुकसान केले. आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली. याच आरोपींवर दरोडाप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल केला. आदेश परशुराम शिंदे (वय १९, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली.

















