- शिपायाने केले आयुक्तांकडे बोट; नगरसेविका गोरखे यांचा संताप..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जून २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अ प्रभागातील कर्मचारी लोकप्रतिनिधींशी उद्धटपणे वागत असल्याचे निदर्शनास आले आहे. पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका व माजी प्रभाग अध्यक्ष अनुराधा गोरखे यांच्यासोबत प्रभागातील एका शिपाई कर्मचाऱ्याने उद्धटपणे वागण्याचा प्रकार घडला आहे.
दोन दिवसांपूर्वी पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी प्रभाग क्रमांक १० व प्रभाग क्रमांक १४ मधील सर्व नगरसेवक व अधिकारी यांची दोन्ही प्रभागातील कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलविली होती. सकाळी ०९.४५ वाजता नगरसेविका अनुराधा गोरखे या अ प्रभागातील बैठकीकरीता जाण्यासाठी लिफ्ट जवळ गेले असता येथील शिपाई कर्मचाऱ्याने त्यांना लिफ्टमध्ये जाण्यास मनाई केली व दरवाजाला आडवा हात लावून सांगितले की लिफ्टमध्ये फक्त आयुक्त जाणार आहे. दुसरे कोणालाही जाण्याची परवानगी नाही.
नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी त्या शिपाई कर्मचाऱ्यास सांगितले की, मी या प्रभागाची माजी अध्यक्ष असून विद्यमान नगरसेविका आहे व मला बैठकीसाठी जायचे असल्याने जाऊ दयावे. त्यानंतरही त्या शिपाई कर्मचाऱ्याने उद्धटपणे बोलत लिफ्टमध्ये जाण्यास नकार दिला, चार ते पाच मिनिटं नगरसेविका अनुराधा गोरखे या शिपाई कर्मचाऱ्याशी वाद घालत असतानाच एका दुसऱ्या शिपाई कर्मचाऱ्याने अनुराधा गोरखे यांना लिफ्टमध्ये जाण्यास सहकार्य केले. असा हा प्रकार अ प्रभाग कार्यालयातील असून जर एखाद्या लोकप्रतिनिधीला येथील कर्मचारी अशी अपमानजनक वागणूक देत असतील तर सामान्य नागरिकांशी हे कर्मचारी कसे वागत असतील हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याचे समोर आले आहे.
नगरसेविका अनुराधा गोरखे या विद्यमान नगरसेविका असून प्रभाग कार्यालयातील माजी प्रभाग अध्यक्ष आहेत तरीही त्यांना या शिपाई कर्मचाऱ्याने उद्धटपणे वागणूक दिली. तर सामान्य नागरिकांना या कर्मचाऱ्यांचा किती त्रास होत असेल हे समजते. महत्त्वाचे म्हणजे या कार्यालयात लिफ्ट बसविण्याचा विषय अनुराधा गोरखे यांनीच मंजूर करुन घेतला होता तसेच अंध, अपंग कर्मचारी व नागरिकांना या लिफ्टचा उपयोग होईल या दृष्टिकोनातून ही लिफ्ट बसवून घेण्यात आली होती तरीसुद्धा अशा उर्मट कर्मचाऱ्यांमुळे हा प्रकार घडला.
नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी याविषयी माहिती घेतली असता कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की प्रशासन अधिकारी यांनी अशा प्रकारच्या सुचना दिल्या होत्या. या प्रकारचा नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी संताप व्यक्त केला असून माझ्यासोबत कर्मचारी याप्रमाणे वागत असतील तर सामान्य नागरिकांबरोबरही हे असेच वागत असतील व त्रास देत असतील, हे असे वागणे बरे नव्हे असे अनुराधा गोरखे यांनी सांगत आपला संताप व्यक्त केला.

















