न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसें.) :- केंद्र सरकारमार्फत सर्वांसाठी घरे २०२२ या संकल्पनेवर आधारित पंतप्रधान आवास योजना अभियान राबविण्यात येत आहे. महापालिका मंजूर विकास आराखड्यात शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) आणि बेघरांसाठी घरे (एचडीएच) या योजनांसाठी जागांची आरक्षणे आहेत. या जागा ताब्यात आल्यानंतर त्याठिकाणी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आकुर्डी, पिंपरी येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांसाठी निविदा प्रक्रियेतील स्पेसिफिकेशनमध्ये फेरबदल करून निविदा मागविल्यानंतर या दोन्ही प्रकल्पांसाठी ८४ कोटी ३२ लाख रुपये लघुत्तम दर सादर केलेल्या एकाच ठेकेदाराला हे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आकुर्डी येथील आरक्षण क्रमांक २८३ येथील बेघरांसाठी घरे (एचडीएच) या आरक्षित जागेवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) ५६८ घरे बांधण्यासाठीच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (डीपीआर) केंद्र सरकारच्या केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीने ७ फेब्रुवारी २०१८ रोजी मान्यता दिली. त्यानुसार, नटवर कन्स्ट्रक्शन यांनी आकुर्डीतील घरांसाठी ५२ कोटी ५० लाख रुपये तर पिंपरीतील घरांसाठी ३१ कोटी ८२ लाख रुपये असा लघुत्तम दर सादर केला आहे. उद्या मंगळवार (दि. १ जाने. ) रोजी होणाऱ्या स्थायी सभेच्या पटलावर मंजुरीसाठी हा विषय असणार आहे.










