न्युज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १ जाने.) :- राज्याला व पिंपरी चिंचवड शहराला लाखोंचा महसूल मिळवून देणाऱ्या उद्योगांना महानगरपालिका ते केंद्र स्तरावरील सर्वच सुविधांसाठी झगडावे लागते. यात काही कंपन्यांना पाण्यासाठी पाण्याचे टँकर देखील बोलवावे लागतात. त्यामुळे पाण्याच्या बिलाचा भारही या उद्योगांना सहन करावा लागतो.
शहरातील ‘टी’ ब्लॉक एमआयडीसीमध्ये पाण्याची समस्या जास्तच बिकट आहे. याबाबत फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी भोसरी एमआयडीसीचे मुख्य अभियंता एस. आर. वाघ, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त गावडे यांची नुकतीच भेट घेउन, त्यांना येथील पाणी समस्येबाबत माहिती दिली होती. पाण्याची पाईपलाईन चाळीस वर्षे जुनी आहे. काही ठिकाणी पाईपलाईनमध्ये झाडाच्या मुळ्या गेलेल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांना पाणी कमी मिळत आहे. कित्येक उद्योगांना पाण्याची मोठी गरज असते व त्याचा परिणाम उत्पादनांवर होतो. त्यामुळे महापालिका व एमआयडीसी यांनी समन्वयाने या परिसरातील पाणी प्रश्न सोडवण्याचे आवाहन भोर यांनी केले होते.
या मागणीची सकारात्मक दखल घेत प्रशासनाने एमआयडीसी परिसरात पाईपलाईन बदलण्याचे काम हाती घेतले आहे. लवकरच उद्योजकांना पाणीपुरवठा नियमितपणे सुरु होईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. पाईपलाईनचे काम सुरू झाल्यामुळे उद्योजकांनी समाधान व्यक्त केले असल्याचे, अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.










