- उन्नती सोशल फौंडेशनने ”सर्वांना एक आव्हान आहे, हे झाड आपण जपायचे आहे’ या उपक्रमाने केले नवीन वर्षाचे स्वागत
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जाने.) :- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने संस्थापक संजय भिसे व अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या पुढाकाराने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (१ जाने) रोजी पिंपळे सौदागर येथील शिवार चौक, पीसीएमसी मैदानावर ”सर्वांना एक आव्हान आहे, हे झाड आपण जपायचे आहे” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध जातीचे सुमारे दोन हजार रोपांचे मोफत वाटप करून, नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
यावेळी उन्नती सोशल फौंडेशनचे संस्थापक संजय भिसे, अध्यक्षा कुंदा भिसे, पी. के. स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, शंकर चोंधे, राजेंद्र जयस्वाल, विनोद भल्ला, विकास काटे, सुनीता बच्चे, मोहिनी मेटे, सुवर्णा काटे, कांचन काटे, मीनाक्षी राजू देवतारे, प्रकाश नगरकर, संभाजी कुंजीर, अशोक काटे, सतीश काटे, संजय डांगे, सागर बिरारी, आनंद योगा हास्यक्लब, नवचैतन्य हास्य परिवार यांच्यासह विविध सोसायटीचे अध्यक्ष व आदी उपस्थित होते.
संजय भिसे म्हणाले की, ‘दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषत: नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत असल्याने, तापमान वाढ आणि हवामानातही बदल घडू लागले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे निसर्गाचे ऋतुमान बदलत चालले आहे. यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गावांची भौतिक निर्मिती करणे ही काळाची गरज मानून, शहरात वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनास प्राधान्य देणे आवश्यक आहे. तसेच अधिकाधिक झाडे लागावीत यासाठी सर्वच घटकांनी वृक्षारोपणाच्या आणि पर्यावरण रक्षणाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. यासाठी एक झाड लावू, एक झाड वाचवू, एक झाड वाढवू’, असा नवीन वर्षाचा संकल्प करण्याचे आवाहन, भिसे यांनी यावेळी केले आहे.
जगन्नाथ काटे म्हणाले की, ‘सध्या विकासाच्या नावाखाली अनेक झाडांची कत्तल केली जाते. त्यामुळे झाडांची संख्या कमी झाली असून, निसर्गाचा समतोल बिघडत आहे. त्यामुळे ‘एक व्यक्ती, एक झाड’ ही संकल्पना राबवून प्रत्येकाने एक झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे. तसेच प्रत्येकांनी आपल्या मुलांप्रमाणे झाडांचे संगोपन करावे. आज वाढलेल्या झाडांची आम्ही काही महिन्यानंतर पाहणी करणार असून, ज्यांनी झाडाचे चांगले संगोपन केले आहे, अशा नागरिकांना मी योग्य बक्षीस देणार असल्याचे काटे म्हणाले.










