न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जाने.) :- पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पिंपरी चिंचवड मनपाला कायमच सापत्नपणाची वागणूक दिले जाते. तरीही सर्व अन्याय सहन करीत, पिंपरी चिंचवड मनपाकडून पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) व्यवस्थापनाला प्रतीवर्षी ४० टक्के परतावा दिला जातो.
त्या बदल्यात शहरातील नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. पीसीएमटीचे पीएमपीएमएलमध्ये विलीनीकरण करून शहराचं वाटोळं झालं आहे. यापुढे सुविधा देण्यात शहराला सवतीसारखी वागणूक दिल्यास पुढील वर्षाचा ४० टक्के फंड दिला जाणार नसल्याचा, सज्जड दम महापौर राहूल जाधव यांनी पीएमपीएमएलच्या व्यवस्थापनाला दिला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या वतीने पीएमपीएमएलला अनुक्रमे ६०-४० टक्क्यानुसार आर्थिक फंड दिला जातो. त्याबदल्यात नागरिकांना सार्वजनिक प्रवासी सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्याचे काम पीएमपीएमएल व्यवस्थापनाचे असते. सध्याच्या व्यवस्थापकीय अध्यक्षा तथा संचलिका नयना गुंडे प्रत्येक वेळी तोंड पाडून बसतात. त्यांना विचारले असता त्या उत्तरे देत नाहीत. त्यामुळे शहरातल्या नागरिकांवर होणारा अन्याय कसा दूर करायचा, असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कंपनीच्या वाहतूक व्यवस्थापक पदाचा पदभार सुनिल गवळी यांना दिला आहे. परंतू, गवळी यांची खातेनिहाय चाैकशी सुरु आहे. त्यांच्यावर गंभीर आराेप असून ती चाैकशी देखील पुर्ण झालेली नाही. त्याचा चाैकशी अहवाल प्राप्त झाल्याशिवाय त्यांना वाहतूक व्यवस्थापक पदाचा पदभार देण्यात येवू नये, – महापाैर, राहुल जाधव










