न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जाने.) :- राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर संतपीठाच्या निविदा प्रक्रियेत ३१ कोटींची अफरातफर केली असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देताना भाजपचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी चांगलाच पलटवार केला आहे.
एकनाथ पवार म्हणाले की, विरोधकांनी संतपीठ समितीमध्ये येड्या-गबाळ्याची नेमणूक करू नका, संत साहित्याचा अभ्यास असलेल्या व्यक्तींचीच समितीमध्ये नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली होती. संतपीठ समितीत पाच सदस्यांची निवड केली आहे. अजून पंधरा सदस्य निवडले जाणार आहेत. समितीमध्ये संत साहित्याचा अभ्यास, सांप्रदायीकतेचा अभ्यास असलेल्या व्यक्तीचीच निवड होणार आहे. राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची समितीमध्ये वर्णी लावली नाही, म्हणून विरोधी पक्षाने भाजपवर आरोप करण्याचा सपाटा लावला आहे.
मी आणि महापौर राहूल जाधव आम्ही दोघे चिखलीचेच नगरसेवक आहोत. आमच्यासह आमदार महेश लांडगे यांचा देखील संतपीठ समितीमध्ये समावेश नाही. आणि होणारही नाही. त्यामुळे बिनबुडाचे आरोप करणे विरोधकांनी सोडावे. संतपीठाच्या कामामध्ये राजकारण आणू नये, असेही एकनाथ पवार म्हणाले.











