न्युज पीसीएमसी नेटवर्क : पिंपरी:- महावितरणातील भोंगळ कारभारामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून ग्राहकांना व पर्यायाने महावितरण वीज कंपनीला आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. या समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्या या करिता विद्युत सनियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी उर्जामंत्री बावनकुळे यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यात पुणे परिमंडळ क्षेत्रात सिंगल व थ्री फेज मीटर्स चा तुटवडा असल्याने ग्रहकांना त्वरित मीटर उपलब्ध करून द्यावेत तसेच पुणे परिमंडळात पहिला जनता दरबार २०/ ४ /१७ रोजी भरला होता त्यानंतर आजतागायत जनता दरबार भरलेलाच नाही. त्याकरिता त्वरित जनता दरबार भरवून विजेच्या समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी केली. यावेळी महेंद्र कांबळे, भरत कुंभारकर, विश्वास ननावरे आदी उपस्थित होते.
पुणे परिमंडळात तीस हजार ते पस्तीस हजार सिंगल फेज मीटर्सची कमतरता जाणवत आहे. प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी मीटर्स बाबतीत वेळोवेळी खोटी बातमी देऊन आरोपांचे खंडन केले असून वर्तमानपत्रातून मीटर्स उपलब्ध असल्याचे खोटे सांगून ग्राहकांची दिशाभूल केली आहे. तसेच गेल्या नऊ महिन्यांपासून सिंगल फेज व इतर मीटर्सची कमतरता संपूर्ण पुणे जिल्ह्यात जाणवत आहे. चार चार महिने मीटर्स देऊ शकत नाही हि वास्तविकता आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्या कडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
महावितरणचे डिजिटल साईट सुद्धा चार चार – पाच पाच दिवस बंद पडत असून कोटेशन निघत नसल्यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप तर कंपनीला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. मुख्य अभियंता पुणे यांच्याकडे निविदा प्रक्रियेचे सर्व अधिकार असताना प्रादेशिक संचालक हे निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करून स्वतः प्रक्रियेत लक्ष देत असल्यामुळे केबल जॉईट निविदा पावसाळा सुरु होण्याआधी निघणे गरजेचे असताना त्या निविदा प्रक्रियेस ऑगस्ट महिन्या पर्यंतचा कालावधी लागला आहे. यामुळे पावसाळ्या आधी होणाऱ्या कामास विलंब झाला आहे.
राठी बेहरे स्विचिंग स्टेशन चे भूमिपूजन दि. २०/०४/२०१७ रोजी उरकण्यात आले होते. त्या वेळी प्रादेशिक संचालक यांनी सदर स्विचिंग स्टेशन चे उद्घाटन तीन महिन्यानंतर मा. मंत्री महोदय यांच्या हस्ते होईल असे जाहीर केले होते. मात्र सदर जागेवर वाद (लेटीकेशन) असताना देखील आपणास प्रादेशिक संचालक यांनी अंधारात ठेऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकला होता. त्या ठिकाणी गेल्या महिन्यापासून कामास सुरवात करण्यात आलेली आहे आज दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे.
आपल्या हस्ते उदघाटन झालेल्या देहूगाव येथील देवी इंद्रायणी स्विचिंग स्टेशनचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे संतोष सौंदणकर यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर पुणे येथील जनता दरबारात आपण जाहीर केले होते कि, सदर कामात अनियमितता झाल्याने केबल बदलण्यात यावी त्याचे चित्रीकरण संतोष सौंदणकर यांना दाखवावे त्यानंतर मी जून १७ ला उद्घाटनला पुन्हा येईन. परंतु प्रादेशिक संचालक यांनी सदर कामाचा ठेकेदार याची चौकशी करून कोणतीच कारवाई केली नाही. सदर स्विचिंग स्टेशनच्या सदोष केबल बदलल्या गेल्या नाहीत अजूनही स्टेशन पूर्ण क्षमतेने चालू नाही. ६००/७०० अँपिएर करंट असणे गरजेचे असताना केवळ १००/१२५ अँपिअर करंटला ट्रीप होते आहे. तसेच सदर स्विचिंग स्टेशन मध्ये खालून पाणी येत असून त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. असे असतानाही निकृष्ट दर्जाच्या या प्रकल्पाचे उद्घाटन परस्पर प्रादेशिक संचालक यांनी उरकून घेतले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा आपण छडा लावून महावितरण विज कंपनीच्या बेजबादार व बेशिस्त अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून जनता दरबारमार्फत पारदर्शक कारभाराची अंमलबजावणी करावी, असे विद्युत सनियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
















