- महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार; नगरसेविका अश्विनी जाधव यांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जून. २०२१) :- चिखली प्रभाग क्र. २ जाधववाडी, राजे शिवाजीनगर, मोशी परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. येथील नागरिकांची वीज समस्या त्वरित सोडविली नाही तर महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा, नगरसेविका अश्विनी जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी दिला.
याबाबत त्यांनी मोशी चिखली महावितरण कार्यालयाचे अधिकारी रमेश सूळ यांना निवेदन देऊन खंडित वीज पुरावठ्यामुळे वर्क फ्रॉम होम कर्मचारी, व्यापारी, वर्कशॉपचे नुकसान होत आहे. त्यासोबतच प्रभागातील सोसायट्यांचा पाणी उपसा वेळेवर होत नाही. त्यामुळे महावितरणने सेवा सुधारावी, अशी मागणी केली होती.
परंतु, पंतनगर कॉलनी क्रमांक एकमध्ये रात्रीपासून लाईट नसल्यामुळे नागरिक हैराण झाल्यामुळे नागरिकांनी नगरसेविका अश्विनी जाधव यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना या समस्येची कल्पना दिली. परंतु वायर उपलब्ध होत नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे दिल्यांनतर महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
















