- १० उपायुक्त व १४ सहायक आयुक्तांच्या फौजेमुळे प्रशासकीय बाजू सक्षम..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. जून. २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार होत असल्याने महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे पालिकेकडून उपायुक्त व सहायक आयुक्तांची पदसंख्या वाढविण्याची विनंती राज्य शासनाकडे केली होती. त्यास शासनाने मंजुरी दिल्याने आणखी उपायुक्त व सहायक आयुक्त पदनिर्मितीस मान्यता मिळाली आहे. त्यामुळे महापालिकेत आता एकूण १० उपायुक्त व १४ सहायक आयुक्त असणार आहे.
महापालिकेचा ‘ ब ‘ वर्गात समावेश झाला आहे. पालिकेच्या नवीन आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियमांना मंजुरी मिळाली आहे. नवीन आकृतीबंधानुसार उपायुक्तांच्या जादा पदांची निर्मिती झाली आहे. पालिका आस्थापनेवर सध्या उपायुक्तांची ८ व सहायक आयुक्तांची १० पदे मंजूर आहेत. भविष्यात पालिकेचा होणारा विस्तार, वाढलेली लोकसंख्या व त्या अनुषंगाने कामकाजात होणारी वाढ विचारात घेऊन आयुक्त राजेश पाटील यांनी उपायुक्त व सहायक आयुक्त यांच्या वाढीव पदांना मंजुरी देण्याची विनंती राज्य शासनाकडे केली होती.
पालिका आस्थापनेवर उपायुक्तांची २ व सहायक आयुक्तांची ४ पदे नव्याने निर्माण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. राज्य सेवेतील ५ उपायुक्त, ७ सहायक आयुक्त व पालिका सेवेतील ५ उपायुक्त, ७ सहाय्यक आयुक्त असा कोटा निश्चित केला आहे. या पदांना पालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२० मधील तरतूदी लागू राहतील. पालिकेच्या आस्थापनेवरील उपआयुक्त व सहायक आयुक्त पदांना शासनमान्य वेतनश्रेणी या पदांनाही लागू राहणार आहे.
सद्यस्थितीत पालिका सेवेतील अण्णा बोदडे, ‘ ग क्षेत्रीय कार्यालयाचे श्रीनिवास दांगट आणि ‘ फ ‘ क्षेत्रीय कार्यालयाचे सीताराम बहुरे असे ३ जण सहायक आयुक्त आहेत. तर, पालिका सेवेतील अधिकाऱ्यांसाठी राखीव असलेली ४ सहायक आयुक्त पदे अद्याप रिक्त आहेत. पालिका सेवेतील मध्यवर्ती भांडार विभागाचे मनोज लोणकर, कायदा विभागाचे चंद्रकांत इंदलकर, सुरक्षा विभागाच्या आशादेवी दुरगुडे व क्रीडा विभागाचे संदीप खोत असे ४ उपायुक्त कार्यरत आहेत. पालिका सेवेतील अधिकाऱ्यांसाठीचे १ पद रिक्त आहे. तर, राज्य सेवेतील पालिकेत प्रतिनियुक्तीवर असलेले प्रशासन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे, नागरवस्ती विभागाचे अजय चारठणकर व करसंकलन विभागाच्या स्मिता झगडे महापालिकेत कार्यरत आहेत. राज्य सेवेतील २ उपायुक्त पदे रिक्त आहेत. दोन्ही मिळून ३ उपायुक्त पदे रिक्त आहेत.
















