पालिकेकडून त्यांचे पैसे ‘रिफंड’ होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जून. २०२१) :- मिळकतकर भरण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ऑनलाइन पेमेंट करताना अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांकडून डबल भरणा होतो. जादा भरलेल्या मालमत्ताकराचा परतावा देण्यासाठी कर आकारणी व करसंकलन विभागप्रमुख असणाऱ्या उपायुक्तांना अधिकार प्रदान केले आहेत. त्यानुसार कराचा डबल भरणा करणाऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.
महापालिकेतील करआकारणी व करसंकलन विभाग हा महापालिकेला उत्पन्न मिळवून देणारा महत्त्वाचा विभाग आहे. मालमत्ताकराची रक्कम परत मिळवण्यासाठी वेब पोर्टल, सारथी ग्रेव्हिअन्स याद्वारे तसेच महापालिका आयुक्तांकडे तक्रारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
नागरिकांना कर भरणा सहज करता यावा यासाठी महापालिकेची शहरात १६ कर आकारणी व करसंकलन विभागीय कार्यालये आहेत. ऑनलाईन कर मालमत्ता धारकांना कराची रक्कम रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्ट, ईडीसी, आरटीजीएस, एनएफटी, यूपीआय, आयएमपीएस अशा ऑनलाईन माध्यमाद्वारे भरणा करता येते.
















