- ९ जुलैनंतर पालिका अनधिकृत बांधकामांवर करणार कारवाई …
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जून. २०२१) :- न्यायालयाने ९ जुलै २०२१ पर्यंत अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनतर पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने अतिक्रमणविरोधी कारवाई मोहीम सुरू केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची जुळवाजुळव पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सुरू केली आहे.
कोरोना संक्रमणामुळे मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अनधिकृत बांधकामांवर कारवाई थांबविण्याचे आदेश दिले आहे. ती मुदत ९ जुलैला संपत आहे. त्यानंतर पालिकेच्या बांधकाम परवानगी व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने कारवाई केली जाणार आहे.
त्यासाठी पोकलेन, जेसीबी, ट्रक व इतर वाहने भाड्याने घेतली जात आहेत. क्षेत्रीय समितीच्या अतिक्रमणविरोधी पथकांना तयारीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, पावसाळ्यात इमारत व बांधकामांवर कारवाई करण्यास मर्यादा आहेत. तसेच, न्यायालयाने स्थगिती आदेशाची मुदत वाढविल्यास कारवाई करता येणार नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
















