- तब्बल अकरा महिन्यांनी दुचाकीस्वारावरच पोलिसांकडून गुन्हा दाखल..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२१) :- भरधाव वेगातील दुचाकी घसरून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना जुलै २०२० मध्ये आकुर्डी घडली. याप्रकरणी दुचाकीस्वारावर स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ११ महिन्यांनी गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश रामकिसन वाघमारे (वय ४०, रा. साईबाबा नगर, चिंचवड स्टेशन) असे गुन्हा दाखल झालेल्या मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पोलीस उपनिरीक्षक के. बी. माकणे यांनी सोमवारी (दि. २८) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ११ जुलै रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास आरोपी वाघमारे हे आपल्या पत्नीला सोडविण्यासाठी दुचाकीवरून भरधाव वेगात चालले होते.
ते आकुर्डीतील बीना इंग्लिश स्कूलजवळ आले असता त्याची दुचाकी घसरून वाघमारे हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी वाघमारे यांच्यावरच गुन्हा दाखल केला आहे.
















