न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२१) :- बोगस चेक देऊन सराफाच्या दुकानातून सव्वासहा लाखांचा ऐवज घेऊन फरार झालेल्या ठगाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. शरद प्रकाश घाडगे (३६, रा. मेदनकरवाडी, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ५ एप्रिल २०१४ रोजी चिंचवड येथील कृष्णा राजाराम अष्टेकर या ज्वेलर्समध्ये बोगस चेक देऊन सहा लाख १८ हजार २८५ रुपयांचे दागिने नेले. चेक बोगस असल्याचे लक्षात आल्यानंतर चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी फरार होता.
पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतरही आरोपी सापडत नव्हता. पिंपरी न्यायालयाने त्याला फरारी घोषित केले होते. दरम्यान, २८ जून रोजी पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार आशिष बोटके व वरिष्ठ प्रदीप गोडांबे यांना माहिती मिळाली की, सराफाला गंडा घालून फरार असलेला आरोपी चाकण येथील आंबेठाण रोडवर उभा आहे. त्यानुसार, त्यांनी परिसरात सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
















