- नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकरांना पत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२१) :- तुकडेबंदी कायद्याचा भंग होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयांतून एक-दोन गुंठे जमिनींचे व्यवहार नाकारण्यात येतात. मात्र, तुकडाबंदी कायद्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा आणि महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण याबाबत अधिनियम १९४७ मधील तरतुदी विचारात घेऊन नागरी भागात, तसेच प्रमाणभूत क्षेत्रात अशा प्रकारच्या व्यवहारांचे दस्त नोंद करून घेण्यासंबंधीचे पत्र महसूल विभागाने राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांना पाठवले आहे.
महसूल विभागाच्या पत्रात नमूद केल्यानुसार महसूल विभागाने नोंदणी महानिरीक्षकांना प्रकरणनिहाय बाब लक्षात घेऊन संलग्न दुय्यम निबंधकांना योग्य त्या सूचना देण्याबाबत सूचित केले आहे. सध्या सरसकट जमीन विक्री व्यवहाराचे दस्त उपनिबंधक नाकारत असून याबाबत लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे हे पत्र महसूल विभागाने नोंदणी महानिरीक्षकांना पाठवले आहे. नोंदणी महानिरीक्षकांनी याबाबतचे परिपत्रक काढल्यानंतर एक-दोन गुंठय़ांचे व्यवहार कायदेशीर चौकटीत सुरू होऊ शकतील.
शासनाने दिलेल्या सूचनेनुसार कायद्याचा अभ्यास करून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडून परिपत्रक काढण्यात येणार आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंद होऊ शकेल. महसूल विभागाने पाठवलेल्या पत्रात विद्यमान कायद्यातील तरतुदींनुसारही एक-दोन गुंठे जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार करू शकणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे.