- ‘पे अँड पार्किंग’ धोरण रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२१) :- कोरोना संसर्गच्या महामारीने पिंपरी चिंचवडकर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून नागरिकांचे लॉकडाऊनमुळे घरांचे, वाहनांचे हफ्ते याशिवाय इतर खर्चाने त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. अशा स्थितीत देखील महापालिकेतील सत्ताधारी भाजपने ठेकेदार पोसण्यासाठी पे अँड पार्क धोरणाची आंमलबजवणी केली जात आहे. हे धोरण नागरिकांची लुबाडणूक करणारे असून ते त्वरित रद्द करा, अशी मागणी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख योगेश बाबर यांनी केली आहे. हे धोरण रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात आवश्यकता नसताना पे अँड पार्क धोरण राबविले जात आहे. महानगरपालिकेकडून नागरिकांना वेठीस धरणारा हा निर्णय घेतला आहे.हा निर्णय गरज नसताना केवळ ठेकेदार व सत्ताधाऱ्यांचे खिसे भरणारा आहे.
पिंपरी चिंचवड शहरात हातगाडी, पथारी व टपरीधारकांच्या हॉकर्स धोरणाची अंमलबजावणी 10 वर्षांपासून रखडली आहे. फेरीवाल्यांचे सर्वेक्षण देखील झाले नाही. पे अँड पार्क धोरणा अगोदर हॉकर्स धोरणाची अंमलबजावणी तातडीने लागु करावे.
तसेच शहरातील अनेक रस्त्यांवर फुटपाथची लांबी वाढली आहे. वेगवेगळ्या कामासाठी नागरिक आल्यानंतर प्रत्येक जण आपले वाहन रस्त्यावर जाऊन लावत असते. त्यामुळे शहरातील मोठे झालेले फुटपाथ तात्काळ कमी करण्यात यावेत. जेणेकरून नागरिकांना रस्त्यावर वाहने लावण्याची वेळ येणार नाही. या विषयी महापालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष घालुन कार्यवाही करावी. तसेच पे अँड पार्क धोरण कायमस्वरूपी रद्द करावे. हे धोरण रद्द न केल्यास शिवसेनेच्या वतीने महापालिका समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बाबर यांनी दिला.