- खंडणी व गुंडा विरोधी पथकाची कामगिरी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२१) :- भोंडवेवस्ती, रावेत येथे पिस्तूल घेऊन आल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे असा ४० हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला. खंडणी विरोधी पथकाने बालाजी उर्फ रामा नारायण उपगंडले (वय ३३, रा. थेरगाव) याला अटक केली आहे.
दरम्यान आणखी एकजण जाधववस्ती, रावेत येथील डी मार्टच्या मागे पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा ५१ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. निलेश विजय गायकवाड (वय २५, रा. रामनगर झोपडपट्टी, वारजे, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दोन्ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार गुरुवारी दि. १ जुलैला दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.