- शिडी वाहनांची संख्या पूर्वरत करा..
- शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांचे ऊर्जामंत्र्यांना पत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२१) :- वीज ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शिडी वाहनं ही दोन शाखा कार्यालयास एक केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम होत आहे. वीज कामगार संघटनेत असंतोष असून त्यांनी अघोषित असहकार पुकारलेला आहे. शिडी वाहनांची संख्या कमी झाल्यामुळे कामाचा अधिकतम भार वीज कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज पुरवठा अखंडित देण्यास विलंब होत आहे. त्यासाठी शिडी वाहनांची संख्या पूर्वरत ठेवा, अशी मागणी पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य तथा शिवसेना चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी राज्याचे उर्जामंत्री नितीन राउत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पुणे विभाग हा ११०० कोटीचा महसूल देणारा विभाग म्हणून संपूर्ण राज्यात अग्रेसर आहे. दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्यास काही क्षणात पोचणारी शिडी वाहनं पैसा वाचविण्यासाठी बंद केली. त्यामुळे एका तासात वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असताना शिडी वाहनांअभावी दोन ते तीन तासांचा विलंब होत आहे. याचा नाहक त्रास ग्राहकांना सोसावा लागतो. त्यामुळे चार आणे वाचविण्यासाठी एक रुपयाच्या विजेचे नुकसान होते.
पुणे विभागात १०० शाखा कार्यालयात १०० शिडी वाहनांचा हिशोब केला तर, महिना ३०,०००/- (अक्षरी तीस हजार) रुपये दराने ३०,००,०००/- (अक्षरी तीस लाख) रुपये होतात. पुणे विभाग हा महसुलीच्या (११०० कोटी) तुलनेत ०.०२७ टक्के एवढा नगण्य आहे. ज्या ठिकाणी एका शाखा कार्यालयात ३०,०००/- (अक्षरी तीस हजार) रुपये वाचवत असेल तर, त्या काळात बंद झालेल्या वीज पुरवठ्यामुळे कमीतकमी महिना दोन ते पाच लाख रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे शासनाने पुन्हा शिडी वाहनं सुरु करण्याचे आदेश द्यावेत. जेणेकरून ग्राहकांना तत्परतेने सेवा देणे सुकर होईल, असे या निवेदनात सौंदणकर यांनी म्हटले आहे.