- विलंबामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला..
- कोरोनामुळे पोटनिवडणुकांच्या तयारीबाबत संभ्रम..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक सात महिन्यांवर येवून ठेपली आहे. मात्र, त्याआधी कोरोनामुळे मृत्यू ओढवलेल्या विद्यमान दिवंगत नगरसेवकांच्या तीन रिक्त जागांवर निवडणूक होणे अपरिहार्य आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या भीतीने पुन्हा लॉकडाऊनचे निर्बंध वाढविण्यात आले आहेत. तीनही प्रभागांमधील पोट निवडणुकांचे कोणतेही आदेश अद्याप पालिकेला प्राप्त झालेले नाहीत. अशाने पोटनिवडणुका होण्याची शक्यता धूसरच दिसते.
राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने व जावेद शेख यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवरील तीन प्रभागांत तीन जागांसाठीची पोटनिवडणूक कोविडमुळे वारंवार पुढे ढकलण्यात आलेली आहे. इच्छुकांचा जीव त्यामुळे टांगणीला लागलेला आहे. निवडणुकीची तयारी करावी का नाही या संभ्रमात ते आहेत.
याबाबत विचारले असता, निवडणूक आयोगाकडून महापालिकेला पोटनिवडणुकीविषयी अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे शहरातील तीन प्रभागांतील पोटनिवडणुकीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे निवडणूक होईल किंवा नाही, हे सांगता येणार नाही, अशी माहिती पालिकेचे निवडणूक अधिकारी बाळासाहेब खांडेकर यांनी दिली.