- शहर मनसेची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जुलै २०२१) :- कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत कोविड प्रतिबंधक लसीकरण वेगाने राबविण्याची गरज आहे. शहरात सध्या वेगवेगळ्या भागात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. परंतु, त्याठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेचे नियोजन कोलमडत आहे. लसीकरण नियोजनाचा पूर्णपणे फज्जा उडत असून नागरिकांची नाहक परेशानी होत आहे.
कोरोनाच्या तिस-या लाटेला सामोरे जात असताना आपल्याला शहरातील प्रत्येक नागरिकाला प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपली यंत्रणा गतीमान करून जास्तीत जास्त नागरिकांना लस टोचणे गरजेचे आहे. लसीकरण करण्यात दिरंगाई झाल्यास कोरोनाची तिसरी लाट प्रभावकारी ठरेल. त्यामुळे लसीकरण मोहीम तिव्र स्वरुपाची करावी. शहरातील सर्वच सोसायट्या, कॉलन्या, चाळीं, झोपडपट्ट्या आदी लोकवस्तीमध्ये जाऊन नागरीकांचे पूर्ण क्षमतेने लसीकरण करण्यात यावे. एकाच ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू न ठेवता लोकवस्तीमध्ये जाऊन नागरिकांना लस दिल्यास फायदेशीर ठरेल. त्यामुळे घरोघरी जाऊन कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम तिव्रपणे राबविण्यात यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर मनसेने पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना निवेदन देताना पिं. चिं. शहर मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, रुपेश पाटेकर, मयूर चिंचवडे, दत्ता देवतासे, विशाल मानकरी, सुरेश सकट, राजू भालेराव, चंद्रकांत दानवले, सुशांत साळवी, अनिता पांचाळ, स्नेहल बांगर, अश्विनी बांगर आदी उपस्थित होते.