- म्हणाले, आता सत्ताधाऱ्यांकडून ठेकेदारांना पोसण्याचा नवा उद्योग..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२१) :- महापालिकेत भाजपच्या सत्तेची साडेचार वर्षे संपत आल्याने पुन्हा कचरा संकलनाचा विषय समोर आणला गेला आहे. शहरातील कचरा समस्या सोडविण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून इंदूर शहराची संकल्पना राबविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी गपचूप दौरे केले जात आहेत, अशी टीका शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी मंगळवारी (दि.६) केली.
कलाटे म्हणाले की, शहराचे दोन भाग करून दोन ठेकेदारांना घरोघरचा कचरा संकलन करून मोशी कचरा डेपोत कचरा वाहतुकीचा ठेका ८ वर्षासाठी देण्यात आला आहे. त्या ठेक्यात भाजप पदाधिकाऱ्यांना मोठा रस होता. ते काम देऊनही कचरा संकलन योग्य प्रकारे होत नसल्याने आता इंदूर शहराची संकल्पना शहरात नव्याने राबविण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी चालविला आहे. स्वच्छ भारत अभियानात शहराचा क्रमांक उंचवावा, अशी सर्वांची भावना आहे. असे असताना सत्ताधाऱ्यांनी अचानक दौरा आखला. त्याबाबत गुप्तता बाळगली. दौऱ्याबाबत सर्व गटनेते व नगरसेवकांना अंधारात ठेवणे, ही बाब शंका निर्माण करणारी आहे.
कोरोना संक्रमण काळात दौरा करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन आहे. दौऱ्यातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी केली होती का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. घराघरातून ओला व सुका कचरा वेगवेगळा घेण्याच्या कामासाठी नागरिकांवर आर्थिक भुर्दड लादला जाऊ नये. तसेच नवीन योजना काय आहे. ती संपूर्ण शहरात कशी राबविणार, त्यावर किती खर्च करणार आदी संपूर्ण माहिती प्रथम जाहीर करावी. त्यानंतरच त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जावी, असे कलाटे म्हणाले.
















