- दुकानदार, भाजी विक्रेते आदींची होतेय जाग्यावरच कोरोना चाचणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची दुसरी लाट तीव्र होती. या लाटेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. जूनमध्ये दुसरी लाट ओसरली. रुग्णसंख्या नियंत्रणात आली. आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिसरी लाट थोपविण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांचा विविध व्यक्तींशी येणारा संपर्क आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता यामुळे महापालिकेकडून जागेवर जाऊन ‘सुपर स्प्रेडर्स’ होऊ शकणाऱ्या दुकानदारांची कोरोना चाचणी केले जात आहे. दर १५ दिवसाला मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून दुकानदारांची अँटिजेन चाचणी केली जाते. पॉझिटिव्ह आलेल्या दुकानदारांना उपचाराचा सल्ला दिला जातो. कोरोनाचे तत्काळ निदान होत असल्याने कोरोनाचा प्रसार नियंत्रणात रहाण्यासाठी मदत होत आहे.
अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचा दररोज विविध नागरिकांशी संपर्क येतो. दुकानदार, भाजी विक्रेते, पथारीवाले, वाहनचालक, एसटी आणि पीएमपीएमएलमध्ये काम करणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, शिक्षक, आरोग्य सेवा देणा-या व्यक्ती आदींचा ‘सुपर स्प्रेडर्स’मध्ये समावेश येतो.


















