न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जाने.) :- पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या वतीने पीएमपीएमएलला अनुक्रमे ६०-४० टक्क्यानुसार आर्थिक फंड दिला जातो. पिंपरी चिंचवड मनपाकडून पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) व्यवस्थापनाला प्रतीवर्षी ४० टक्के परतावा दिला जातो. त्याबदल्यात नागरिकांना सार्वजनिक प्रवासी सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्याचे काम पीएमपीएमएल व्यवस्थापनाचे असते. परंतु, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पिंपरी चिंचवड मनपाला कायमच सापत्नपणाची वागणूक दिले जाते.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कंपनीच्या वाहतूक व्यवस्थापक पदाचा पदभार सुनिल गवळी यांना दिला आहे. परंतू, गवळी यांची खातेनिहाय चाैकशी सुरु आहे. त्यांच्यावर गंभीर आराेप असून ती चाैकशी देखील पुर्ण झालेली नाही. त्याचा चाैकशी अहवाल प्राप्त झाल्याशिवाय त्यांना वाहतूक व्यवस्थापक पदाचा पदभार देण्यात येवू नये, अशी मागणी महापौर राहुल जाधव यांनी पीएमपीएमएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे केली होती.
परंतु, गुंडे यांनी महापौरांच्या मागणीस केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे महापौरांनी पीएमपीला कुठलाही निधी न देण्याची घोषणा केली असून, सुनील गवळी यांना पदावरून दूर न केल्यास पीएमपी संचालकपदाचा राजीनामा देण्याची घोषणा महापौर जाधव यांनी शुक्रवारी (दि. ४ ) रोजी घेतलेल्या पत्रकार परिषद केली आहे.















