- सल्लागाराच्या नियुक्तीस स्थायीचा हिरवा कंदील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२१) :- भोसरी येथील जुन्या रुग्णालयात अद्ययावत प्रसूतिगृह उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. येथे महिलांसाठी प्रसूतीविषयक व नवजात शिशुंसाठी लागणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. रुणालयाच्या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यास स्थायी समितीने शुक्रवारी (दि.१६) मान्यता दिली आहे.
पालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयात जुने भोसरी रुग्णालय आहे. हे रुग्णालय टाटा रूग्णालय म्हणूनही ओळखले जाते. येथे फक्त महिला प्रसूतिगृह व नवजात शिशुंसाठी (एलआयसीयू) अद्ययावत रग्णालय उभारण्याची तयारी पालिकेने केली आहे. या कामास ३१ मार्चमध्ये सुमारे १० कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी वास्तुविशारद नेमणे आवश्यक आहे. नकाशे तयार करणे, डिझाईन करणे, प्लॅन तयार करणे, अंदाजपत्रक तयार करणे, निविदा बनविणे आणि कामावर देखरेख ठेवण्यासाठी सल्लागार नियुक्ती केली जाणार आहे.
स्थापत्य विभागामार्फत वास्तुविशारद यांचे दर मागविण्यात आले होते. त्यानुसार ड्रीम डिझाइनर आर्किटेक्टस यांनी कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविली आहे. प्रकल्प खर्चाच्या एकूण १.९५ टक्के इतका खर्च या सल्लागाराला दिला जाणार आहे. त्यांची नियुक्ती करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.