- पोलिसांकडून कलम १४४ ची कडकडीत अंमलबजावणी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२१) :- पर्यटनस्थळांवर पर्यटकांची होणारी गर्दी रोखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी पर्यटनस्थळ परिसरत जमावबंदी कलम १४४, ११० (३) लागू केला आहे. त्यानंतर लोणावळा शहर व ग्रामीण पोलिस प्रशासन, लोणावळ नगरपरिषद तसेच परिसरातील ग्रामपंचायती यांनी या आदेशाची शनिवार आणि रविवारी कडक अंमलबजावणी केल्याने सर्व पर्यटनस्थळे निर्मनुष्य झालेली होती.
लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी भुशी धरण, सहारा पूल, धबधबा, लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, शिवलिंग पॉइंट या परिसरात जाणाऱ्या मार्गावर नौसेना बाग येथे चेकपोस्ट लावत या ठिकाणावरून सर्व पर्यटकांना माघारी पाठवले. याशिवाय तुंगार्ली धरण, लोणावळा धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांना देखील माघारी परतविण्यात आले.
राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर राजमाची उदेवादी ग्रामपंचायत, वन खात्याचे अधिकारी आणि पोलिसांनी चेक पोस्ट लावून पर्यटक माघारी धाडले. लोणावळा परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असल्याची माहिती असताना देखील मुंबई, पुणे भागातून अनेक पर्यटक लोणावळा शहरात दाखल झाले होते. शहरात वीकेंड लॉकडाउन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली होती. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी भरारी पथके तयार करत गर्दीच्या ठिकाणी दंडात्मक कारवाई केली.