- युरोपातील मोहिमेसाठी मंगळवारी होणार रवाना..
- आमदार महेश लांडगे यांच्याकडून कौतुकाची थाप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२१) :- युरोप खंडातील सर्वांत उंच मानल्या जाणारे माउंट एल्ब्रुस ज्याची उंची तब्बल ५ हजार ६४२ मीटर आहे. हे शिखर सर करण्यासाठी भोसरीतील १२ वर्षीय गिरीजा लांडगे मंगळवारी (दि.२०) रवाना होणार आहे.
गिरीजाच्या ‘माउंट एल्ब्रुस ‘ या मोहीमेचा फ्लॅग ऑफ भोसरी पीएमटी चौक येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीसमोर करण्यात आला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे व ग्रामस्थ उपस्थित होते.
माउंट एल्ब्रुस हे युरोप खंडातील सर्वोच्च शिखर मानले जाते. निद्रिस्त ज्वालामुखी म्हणूनही या पर्वताला ओळखले जाते. तेथील तापमान उणे २५ ते ४० डिग्रीपर्यंत असते. या शिखरावर चढाई करण्यासाठी गिरीजाची तयारी पूर्ण आहे. भोसरीतून उद्या (२० जुलै) ती निघणार आहे. सलग १० दिवसांची ही मोहीम असून, या शिखरावर चढाई करणारी ती महाराष्ट्रातील व भारतातली पहिलीच मुलगी आहे . गिरीजाने आत्तापर्यंत सह्याद्रीतील लिंगाणा, वजीर, तैलबैल, नागफणी, कळकराय, संडे-१, संडे-२, वानरलिंगी असे अवघड सुळके सर केले आहेत. त्याबरोबर नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ६५ किल्ल्यांवर भटकंती केली आहे.तिच्या लिंगाणा, वजीर या सुळक्यांवर केलेल्या चढाईची युनिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये यंगेस्ट माउंटेनिअर म्हणून नोंद झालेली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी गावात राहणारी गिरीजा बाल गिर्यारोहक म्हणून प्रसिद्ध आहे. या आधी तिने अशाच पद्धतीने अनेक अवघड मोहिमा सर केल्या आहेत. तिच्या या अनेक मोहिमा सामाजिक संदेश देणाऱ्या असतात. गिरीजा बाल गिर्यारोहक म्हणुन नक्कीच आमचे नाव उंचावत आहे, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्ती केली.













