- रहदारीचा रस्ता असल्यामुळे स्थानिकांची वाढली डोकेदुखी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. जुलै. २०२१) :- पालिकेने आठवड्यापूर्वी रस्टन कॉलनी समोरील चिंचवडेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पंचवटी चौक परिसरातील सुस्थितीत असणारा पदपथ उखडून टाकला आहे. सिमेंटचे पेव्हिंग ब्लॉक भर रस्त्यातच रचून ठेवले आहेत. आठवड्याहून अधिक कालावधी लोटला तरी, अजून काम उरकले नाही.
त्यामुळे रस्ता आणखीनच अरुंद झाला आहे. येथे जवळच वस्ती आहे. रहदारीचा रस्ता असल्यामुळे तेथील रहीवाशांना देखील या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. वाहनचालकांचीही कसरत होतेय. भर रस्त्यातच असल्याने ब्लॉक चोरीला जाण्याची शक्यताही आहे.
कोरोना कालावधीत खर्चामध्ये काटकसर करण्याऐवजी सुस्थितीतील ब्लॉक उखडून नागरिकांच्या पैशांच्या उधळपट्टीचे धोरण पालिकेने तयार केले आहे काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. त्याकडे स्थानिक नगरसेवकांचेही दुर्लक्ष होताना दिसतेय.