न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. ७ जाने.) :- सर्वच वयोगटातील खेळाडू क्रीडा स्पर्धेत, उपक्रमात सहभाग घेतात. मॅराथॉन, कबड्डी, बॉस्केटबॉल, हॉकी आदी खेळांत सहभागी होऊन मैदानी व राष्ट्रीय खेळाला बळकटी देतात. परंतु, खेळाडूचे लक्ष खेळाऐवजी आपल्या करिअरकडेच जास्त असते. बालपणातच व विद्यार्थी दशेतच मुलांनी विविध मैदानी व राष्ट्रीय क्रीडा प्रकारामध्ये नैपुण्य मिळवण्यासाठी मेहनत घेणे गरजेचे आहे. तसेच खेळाप्रती भावना वाढीस लागावी याकरीता पालकांनीही मुलांना खेळ खेळासाठी खेळण्याची सवय लावावी. केवळ खेळासाठी पैसा व पैशासाठी खेळ हा दृष्टीकोन बाजूला ठेवून, त्यांना राष्ट्रासाठी खेळ खेळला पाहिजे, अशी शिकवण द्यावी, असे प्रतिपादन माजी ऑलिंपियनपटू बाळकृष्ण आकोटकर यांनी केले.
मोशी-प्राधिकरण येथील गॅलक्सी किड्स प्री. प्रायमरी स्कूलच्या वतीने रविवार (दि. ०६) रोजी आयोजित ‘स्पोर्ट डे’ चा बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आकोटकर बोलत होते.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी जनार्धनन यांनी माजी ऑलिंपियनपटू बाळकृष्ण आकोटकर यांचा सत्कार केला. विविध क्रीडाप्रकारात विजेत्या बाल खेळाडूंना त्यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालक व ज्येष्ठ नागरिक व शाळेतील शिक्षिका आदी उपस्थित होते.


















