- आठवडाभराची मुदत; अन्यथा पंचनामे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२१) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघ यादीत ६ हजार ७५२ मतदारांच्या छायाचित्रांचा समावेशच झालेला नाही. नागरिकांनी मतदार यादीत आपले छायाचित्र आहे की नाही, तपासून घ्याव. छायाचित्र नसल्यास येत्या आठवडाभरात थेरगाव येथील कार्यालयात जमा करावे. अन्यथा संबंधित मतदारांबाबत प्रत्यक्ष घरभेटी देऊन पंचनामा केला जाणार आहे.
मतदार स्थलांतरित झाला आहे का, मृत झाले आहे का किंवा अन्य काही कारणे आहेत, याची पडताळणी केली जाईल. त्यानंतर संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी स्मीता झगडे यांनी दिली.
झगडे म्हणाल्या की, चिंचवड विधानसभा मतदारसंघात सध्या एकूण ५ लाख २८ हजार ८६८ मतदार आहेत. मतदारयादीत मतदारांच्या छायाचित्राचा समावेश असावा, यावर सध्या कटाक्ष ठेवण्यात आला आहे. मतदारांनी www.pune.nic.in किंवा www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी उपलब्ध आहे. ज्या मतदारांनी ई – निवडणूक ओळखपत्रासाठी ( ई – ईपीक ) अर्ज केले आहे त्या नागरिकांना एसएमएस पाठविण्यात येत आहे.












