- पाच जणांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२१) :- श्रध्दा जायभाये (वय २८, सध्या रा. कावेरीनगर पोलीस लाईन, वाकड, पुणे), या विवाहीत महिला पोलिसाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांचे पती नेव्हीमध्ये नोकरीसआहेत. श्रध्दा यांना दोन वर्षांची मुलगी आहे.
वाकड येथे सोमवारी (दि. ५) रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. श्रध्दा यांनी पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला असल्याचे आढळले होते.
पोलिसांनी त्यांच्या आत्महत्येचा छडा लावला आहे. श्रध्दा या पुणे शहर दलाच्या विशेष शाखेत नेमणुकीस होत्या. लग्नानंतर सासारच्या लोकांनी श्रद्धा यांच्याकडे माहेरहून घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन ‘तुला आम्ही नांदवणार नाही. तुला घटस्फोट द्यावा लागेल. नाहीतर तुला व तुझ्या बाळाला जीवे मारून टाकू’ अशी धमकी दिली. श्रद्धा यांना वारंवार शिवीगाळ व मारहाण करून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.
त्यांच्या आईने बुधवारी (दि. २१) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती पवनकुमार बंकिम दहिफळे (वय २९), सासू सागरबाई बंकिम दहिफळे (वय ४५), सासरे बंकिम बाबुराव दहिफळे (वय ५२), दिर भगवान उर्फ पप्पू बंकिम दहिफळे (वय २४), आज्जे सासू मुक्ताबाई नामदेव वाघ (वय ६५, सर्व रा. दैत्यनांदुरा, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.












