- सहा जणांवर गुन्हा दाखल; दोघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२१) :- आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव जमून साथरोग नियंत्रण अधिनियमाची पायमल्ली करून पोलिसांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. आकुर्डी पोलीस चौकीत गुरुवारी (दि. २२) रात्री दहा वाजता एका तक्रार अर्जाची चौकशी सुरू होती. त्यावेळी ही घटना घडली.
पोलीस नाईक सचिन बेबले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
विश्वास बाबुराव निकम (वय ६४), विजय निकम (वय ६०), शोभा निकम (वय ५०), सागर विश्वास निकम (वय ३५), सरला सपकाळे (वय ४५), मिलिंद रणदिवे (वय ५५, सर्व रा. निगडी प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. विश्वास निकम आणि सागर निकम या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.