- शहर भाजपला दिली कावळ्याची उपमा..
- शहरातील दोन्ही आमदारांच्या मागे ईडी व गुन्हे शाखेचा सिसेमिरा लावण्याचा इशारा..
- शिवसेना शहराध्यक्ष अॅड. सचिन भोसलेंकडून पत्रक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२१) :- भाजप आमदाराच्या कुटुंबातील सदस्याच्या नावाने असलेल्या क्रिस्टल कंपनीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात भ्रष्टाचार केला आहे. शंभरहून अधिक कोटीचा आर्थिक घोटाळा केल्याचे पुरावे आम्ही सक्त संचालनालय (ईडी) कडे सादर करणार आहे. भाजप नेत्यांमध्ये खरच हिंमत असेल तर त्यानी ईडीच्या चौकशीला सामोरे जावे. त्यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी एकदा होवून जावू दया, असे आव्हान शिवसेना शहराध्यक्ष तथा नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपला दिले आहे.
पत्रकात भोसले यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीचे मुळात तीन नगरसेवक होते. २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फोडा-फोडी करत महापालिकेवर भाजपला सत्ता मिळाली. म्हणून आताची भाजपा निष्ठावंताची नसून आयाराम – गयारामाची पार्टी बनली आहे. त्या पार्टीत मूळ भाजपचे नेते व नगरसेवक किती आहेत? हे आशिष शेलार यांनी तपासून पहावे. भाजपच्या नेत्यांना महापालिकेच्या सत्तेची सूज आली असून महापालिकेच्या निवडणुकीत जनताच त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर ख-या अर्थाने कधी नव्हे ती शहराची फाळणी झाली आहे. शहरात दक्षिण – उत्तर संस्थाने वाटप करुन भाजपच्या दोन आमदारांनी आपापले बगलबच्चे, कार्यकर्त्यांच्या ठेकेदारी माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारत आहेत. या सत्तेतून भाजपच्या दोन्ही आमदारांनी किती कोटीची माया गोळा केलीय हे त्यांनाच माहिती आहे. त्यांनी केलेला भ्रष्टाचार आणि घोटाळ्यामुळे आता कळस गाठला आहे. या दोन्ही आमदारांचीदेखील ईडी अथवा राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. पिंपरी चिचवड महापालिकेतील कचरा, पाणी, पर्यावरण, आरोग्य, भांडार, वैदयकीय विभागातील ठेकेदारीसह टीडीआर, एफएसआय मिळवून देत हजारो कोटी रुपये भाजप नेत्यांनी स्वतःच्या घशात घातले आहेत. महापालिकेच्या प्रत्येक विभागातील भ्रष्टाचाराची माहिती घेवून राज्य शासनाकडे पुराव्यानिशी माहिती देणार आहे. प्रत्येक निविदा व टेंडर प्रक्रियेची माहिती गोळा करण्यात येत आहे. सगळ्या प्रकरणाची राज्य शासनाकडे माहिती देवून स्वतंत्र समिती गठीत करुन अंदाधूद कारभाराची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. पिपरी चिवडच्या जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता सत्ताधारी भाजपने केलेली नाही. उलट त्यांनी सत्तेच्या धुंदीत महापालिकेची तिजोरी लुटून खाण्याचा प्रयत्न केलाय. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराची एक – एक प्रकरणे पुराव्यानिधी जनतेसमोर आणणार आहे. त्या निवडणुकीत पिंपरी – चिंचवडची जनताच भाजप नेत्याची कपड़े फाडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कावळ्यानी कितीही अंग धुतले तरी त्याचा बगळा होत नाही, हे देखील त्यांनी लक्षात ठेवावे असेही अॅड. भोसले यानी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.