न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जाने.) :- देशपातळीवरील संयुक्त कृती समितीच्या आदेशानुसार दिनांक आठ व नऊ जानेवारी २०१९ या दिवशी देशातील टपाल खात्यांचे सर्व कामगार संपात सहभागी झाले आहेत. आज मंगळवार (दि. ८) रोजी पहिल्या दिवशी सर्व कामगारांनी एकजूट दाखवत संप १००% यशस्वी केला आहे.
या देशव्यापी संपामध्ये नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्पलॉइज, नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्पलॉइज, नॅशनल युनियन ऑफ मैल मोटर सर्विस, नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक, नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल एम्पलॉइज इत्यादी टपाल कामगार संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला.
टपाल खात्यांमध्ये रिक्त जागा न भरता एका कर्मचाऱ्याला दोन कर्मचाऱ्याचे काम देऊन शारीरिक व मानसिक त्रास सरकार देत आहे. खात्यामध्ये नवीन आलेल्या प्रणाली जसे, कोर बँकिंग सर्विस, आर आय सी टी तसेच आधार अपडेटेशन, यामुळे कामगार कमतरता व प्रणालीमधील त्रुटींमुळे कामगार व ग्राहक यांच्यात वाद होत आहेत. त्यामुळे कामगार व ग्राहक दोघांनाही मानसिक तसेच शारीरिक त्रास होत आहे.
पिंपरी-चिंचवड तसेच पुणे शहरातील सर्व टपाल कर्मचारी आज चिंचवड पूर्व डाकघर येथे जमले या ठिकाणी के एस पारखी, डी आर देवकर, राजू करपे, बी पी मराठी, एस जी डुंबरे, अक्षय मिंढे, एस बी कारले, रमेश कांबळे इत्यादी नेत्यांनी मार्गदर्शन केले. विष्णु गायकवाड यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमास पी एस हजारे, भरत बागडे, जयदेव थोरात, प्रकाश सोंडकर, कृष्णा केंगार, सर्जेराव ठोंबरे, एम व्ही बोरकरआदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
संपाच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे – सर्व प्रकारच्या रिक्त जागा भरण्याचे काम इतर संस्थानांना न देता खात्याने स्वतः भराव्यात, नवीन पेन्शन ऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करावी, ग्रामीण डाक सेवकांना खात्याच्या कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा द्यावा, सी जी एच एस उपचारासाठी कॅशलेस सुविधा द्यावी, सर्व कंत्राटी कामगारांना खात्यात कायम करावे, सर्व कर्मचाऱ्यांना पाच प्रमोशन देऊन प्रमोशन साठीचा व्हेरी गुड बेंचमार्क रद्द करावा, टपाल खात्याचे खाजगीकरण थांबवावे, इंटरनेट सुविधा सुधाराव्यात.















