न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जाने.) :- पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील टाळगाव चिखली परिसरात नागरीकरण प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या परिसरात कामानिम्मित परप्रांतीयांचा लोंढा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या परिसरात मनपाची शाळा असून, ती विद्यार्थ्यांकरिता तोकडी पडत आहे.
याबाबत चिखली-कुदळवाडीतील स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी महापालिका आयुक्त व शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांची नुकतीच भेट घेतली व त्यांना मागणीचे निवेदन दिले आहे.
यात यादव यांनी म्हटले आहे की, मनपाची कुदळवाडी येथे प्राथमिक शाळा क्रमांक ८९ आहे. या शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत वर्ग आहेत. येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना ८ वी व पुढील शिक्षणासाठी शहरातील इतर परिसरात जावे लागते. मनपाकडून माध्यमिक शाळेसाठी इमारत बांधणीचे काम चालू आहे. हे काम पूर्णत्वास येण्यासाठी ३ ते ४ महिन्यांचा कालवधी लागणार आहे. विद्यार्थ्यांची फरफट होऊ नये याकरीता, माध्यमिक शिक्षण विभागाकडून इयत्ता ८ वी ते १० वी चे वर्ग मान्यतेसाठी कार्यवाही करण्याची मागणी यादव यांनी आयुक्त व सभापती यांच्याकडे केली आहे.











