- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हजारो बाधितांच्या हक्कासाठी न्यायालयात जाणार – दत्ता साने
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जाने.) :- “शासनाची अंतिम मंजुरी नसलेल्या एचसीएमटीआर रिंग रेल्वे प्रकल्पाऐवजी रस्ता बनविण्याचा प्रयत्न महापालिका करीत आहे. अनेक बाधितांची घरेही एचसीएमटीआर च्या नावाखाली पाडली आहेत. गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपळे गुरव, कासारवाडी परिसरातील ३७०० घरे रिंग रेल्वे प्रकल्पामुळे बाधित होत आहेत. सदरच्या प्रकल्पाला मंजुरी नसताना कोकणे चौक ते काळेवाडी फाटा ही १.६ किमी ची २८ कोटी रुपयांची निविदा बेकायदेशीरपणे मंजूर करण्यात आली आहे. सदरची निविदा काढत असताना पूर्ण भूसंपदानही पालिकेकडे नाही. १६०० मीटर पैकी ६०० मीटर जागाही पालिकेच्या ताब्यात नसताना राजकीय दबावापोटी पालिकेने निविदा काढलेली दिसून येत आहे. याबाबत पालिकेने रस्त्याचे काम त्वरीत थांबवावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न्यायालयात जाईल याची माननीय आयुक्तांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.”
एचसीएमटीआर रिंग रेल्वे बाधित घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला घेऊन आज रोजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची महापालिकेच्या आयुक्त सदनात भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जयश्री डांगे, राष्ट्रवादी पक्षाच्या जेष्ठ सदस्या श्यामला गायकवाड, मयुर कलाटे, अतुल काशीद, अमरसिंग आदियाल, तानाजी जवळकर, प्रदीप पवार, निलचंद्र निकम, हर्षल काटे, समन्वयक गौसिया शेख, उमाकांत सोनवणे, गोपाळ बिरारी, माणिक सुरसे, प्रितम पवार, सचिन पोखरकर,धनाजी येवले, नंदकुमार नायकोडी, पोपट पवार, प्रमोद विभूते, मंगल नायकोडी, पार्वती पोखरकर, सुप्रिया शेलार, के डी पाटील, बा भि काळे, मोहमुद्दीन शेख, विशाल माने, अमोल कानु, अमित डांगे आदी उपस्थित होते.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जयश्री डांगे म्हणाल्या,”सध्या प्रशासनाचा सावळा गोंधळ सुरू आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना तोंडं बघून कारवाई केली जात आहे. सामान्यांच्या घरांवर बुलडोझर फीरवून कोणाचे हित साधणार आहात, याचा स्पष्ट खुलासा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी करावा. २०१२ नंतर शहरात लाखो अनधिकृत बांधकामे उभी करण्यासाठी बीट मार्शल आणि क्षेत्रीय अधिकारी हेच कारणीभूत ठरतात, अश्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे. यासाठी आपणास १५ दिवसाची मुदत आहे. त्यानंतर मात्र आम्हास भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात जावेच लागेल.”
घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील म्हणाले,” पालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी अभियंत्यांना रूट व रस्ता त्याचप्रमाणे टर्मिनल व स्टेशन यातील फरक अद्याप समजला नाही. मंजूर नसलेल्या एचसीएमटीआर बाबत त्यांनी आयुक्त व लोकप्रतिनिधी यांना अंधारात ठेवून चुकीची माहिती दिली. त्यामुळे एचसीएमटीआरच्या नावाने ठराव संमत होऊन नियमबाह्य निविदाही निघाली, अश्या बेकायदेशीर कामामुळे काळेवाडी फाटा ते कोकणे चौक दरम्यानच्या घरावंर अमानुषपणे हातोडा पडला व अनेक कुटुंबे रस्त्यावर आली. आता अश्या सर्व बेकायदेशीर कारवाही झालेल्या सर्व रहिवाशी घरांची पुनरबांधणी आहे त्या जागेवर पालिकेने स्वखर्चाने करून द्यावी.”
या तिघांच्या व्यक्तव्यावर उत्तर देताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले,”एचसीएमटीआर बाबत फक्त तीन दिवसात निर्णय घेतला जाईल. जागा पूर्ण ताब्यात आहे अथवा नाही याबाबत अधिकारी यांचेशी चर्चा केली जाईल. हजारो बाधितांच्या घरांचा प्रश्न असल्याकारणाने कायद्याच्या सर्व बाजू तपासून घेतल्या जातील.”
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्यामला गायकवाड म्हणाल्या, “एचसीएमटीआरच्या गोंडस नावामागे आमदारांची खेळी असून, सदरचे काम आमदारांच्या दबावापोटी अधिकारी करीत आहेत. याबाबत चौकशी करावी व कायद्याच्या कोणत्याही प्रक्रियेचे पालन न करणाऱ्या तसेच नियमबाह्य रस्ता निविदा काढणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे.” त्यानंतर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी नगरसेविका मंगला कदम, डॉ.जयश्री घोडेकर, नगरसेवक राजू मिसाळ, प्रशांत शितोळे, मच्छिंद्र तापकीर, मयुर कलाटे यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते कक्षात रिंग रोड बधितांची बैठक घेतली.











