न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जाने.) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा बहुचर्चित जेएनएनयूआरएम अंतर्गत झालेला चिखली येथील घरकुल प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वाराला स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यास येथील स्थानिक रहिवाश्यांनी विरोध दर्शविला आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी महापालिकेने २०१४ रोजी हा प्रकल्प पूर्ण केला असून, सध्या ५ हजार ४६० कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. या घरकुल प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वाराला स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याचा ठराव नुकताच ‘फ’ प्रभाग समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला आहे. या संदर्भात संविधान दिन सोहळा समिती घरकुलच्या वतीने आज आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘से. नं. १७ व १९ येथील घरकुल प्रकल्पाच्या प्रवेशद्वारास कोणत्याही जाती-धर्माच्या देव-देवतांचे तसेच राजकीय पक्षांच्या हयात असलेल्या किंवा हयात नसलेल्या नेत्यांचे नाव न देता कोणत्याही एका महामानवाचे नाव द्यावे. कारण हा प्रकल्प भारत सरकारने ‘जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजने’अंतर्गत राबविला गेला आहे. त्यानुसार या प्रकल्पाला कोणत्याही राजकीय नेत्यांचे अथवा स्थानिक पुढाऱ्यांचे नामकरण न करता ते खालीलप्रमाणे असावे १. राष्ट्रमाता जिजाऊ घरकुल संकुल, २. ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले घरकुल संकुल, ३. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज घरकुल संकुल, ४. छत्रपती शाहू महाराज घरकुल संकुल, ५. महात्मा जोतिराव फुले घरकुल संकुल, ६. डॉ. बाबासाहेब आंबेडकर घरकुल संकुल, ७. फुले शाहू आंबेडकर घरकुल संकुल या नावांपैकीच कोणतेही एक या घरकुल संकुलास देऊन नामकरण करावे.
या व्यतिरिक्त कोणत्याही जाती धर्माच्या देव-देवतांचे व कोणतेही राजकीय नेते (हयात असलेले किंवा हयात नसलेले) यांचे नाव देऊन प्रकल्पाचे नामकरण करू नये, त्यामुळे वरीलपैकी एक नाव देऊन सर्व जातीधर्मातील लोकांच्या भावनेचा विचार जपला जाईल.’’ या पत्रकावर ३५० घरकुलवासियांच्या सह्या असून, या समितीचे प्रमुख विजय गेडाम यांनी याचे नेतृत्व केले आहे.











