न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जाने.) :- पिंपरी चिंचवड शहरातील अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अपना वतन संघटनेच्या वतीने शनिवार (दि. १९) रोजी मुख्यमंत्र्यांच्या ” वर्षा ” बंगल्यावर निदर्शने व आंदोलन करण्यात येणार आहेत. याबाबत अपना वतन संघटनेने प्रसिद्धीस निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, अवैध धंद्यांमुळे व अमली पदार्थांच्या सेवनामुळे देशातील तरुण पिढी उध्वस्त होत आहे. अवैध धंद्यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा काळा पैसा गोळा केला जातॊ, अवैध धंद्यांच्या मूळे अनेक महिला भगिनींचे संसार मोडले जात आहेत. अवैध धंद्यांकडून महसूल व प्राप्तिकर बुडवला जात असून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या व प्राप्तिकर भरणाऱ्या व्यावसायिकांवर अन्याय होत आहे.
याचा गंभीर परिणाम आपल्या जनतेवर होत असून, पोलीस व प्रशासकीय यंत्रणा भ्रष्ट होत चालली आहे. यामुळे अपना वतन संघटनेच्या वतीने मार्च २०१८ पासून स्थानिक पोलीस यंत्रणा व मुख्यमंत्री कार्यालयास वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. शहरातील अवैध धंदे बंद करून हफ्ते वसुली करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वारंवार पोलीस आयुक्त आर .के . पद्मनाभन यांना केली होती. परंतु, त्यांनी अवैध धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे असे निदर्शनास येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील वाकड, हिंजवडी, सांगवी, चिंचवड, पिंपरी, भोसरी, निगडी, देहूरोड, तळेगाव, चाकण, चिखली, भोसरी एमआयडीसी या सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलिसांच्या परवानगीने अनेक नवीन अवैध धंदे सुरु झाले आहेत. त्यामुळे देशहिता पेक्षा स्वतःचा आर्थिक स्वार्थ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना महत्वाचा वाटतोय असेच स्पष्ट होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील अवैध धंदयांना जबाबदार पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ” वर्षा ” बंगल्यावर निदर्शने व आंदोलन करण्यात येणार आहेत, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.











