- या स्वच्छतागृहात प्रवेश करायचा म्हणजे ‘मोठं अग्निदिव्यचं’..
- कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची मोठी गैरसोय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२१) :- पिंपळे सौदागर परिसरातील महादेव मंदिराजवळील मुख्य रस्त्याच्या कडेलाच असणाऱ्या छोट्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची (मुतारी) दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
मुख्य रस्त्याशेजारील पदपथाला जोडून असणाऱ्या या स्वच्छतागृहामध्ये प्रवेश करायचा म्हणजे मोठे अग्निदिव्यच ठरतेय. पदपथाची उंची वाढविल्यामुळे स्वच्छतागृहाचा (मुतारी) अर्धा भाग राडा-रोड्याच्या खाली गेलाय. या स्वच्छतागृहात माती व खडीच्या ढिगाऱ्यावरून प्रवेश करताना काहीजण घसरून पडलेत. त्यांना इजाही झाली आहे. स्थानिक नगरसेवकाचे कार्यालय या स्वच्छतागृहापासून अगदी हाकेच्या अंतरावर असताना देखील या बाबीकडे दुर्लक्ष होतेय.

लोकसंख्येच्या तुलनेत व वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या खूपच कमी असल्यामुळे नाईलाजाने नागरिकांना याचा वापर करावा लागतोय. काही ठिकाणी गरज नसताना आधुनिक प्रकारच्या स्वच्छतागृहांची उभारणी केली जातेय. तीचा नागरिकांना किती उपयोग होतो? हा संशोधनाचा विषय असल्याचे मत प्रभागातील काही नागरिक व्यक्त करू लागलेत. या सार्वजनिक स्वच्छतागृहाची (मुतारी) डागडुजी करून ते नागरिकांना वापरयोग्य करून देण्याची मागणीही होतेय.
पिंपळे सौदागर या उपनगराला स्मार्ट सिटी अंतर्गत सर्वात जास्त निधी मिळालाय. मात्र, चमकोगिरी व आभासी चित्र निर्मितीच्या उद्योगात रमलेल्या पालिका प्रशासनाला व स्थानिक नगरसेवकांना नागरिकांना नेमकं हवंय काय? याचाच विसर पडलाय. अशा बाबींकडे पालिकेचे व पर्यायाने नगरसेवकांचे होणारे दुर्लक्ष भविष्यात त्यांचीच डोकेदुखी वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते.












