- पिंपळे सौदागरच्या चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२१) :- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये आज रविवार (दि. १५) रोजी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीतच ७५ वा स्वातंत्र्यदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत, मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे यांच्या नेतृत्वाखाली ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दरम्यान शाळेची गुणवंत विद्यार्थिनी आर्या ठुसे, अवनी माळवदकर आणि त्यांचे पालक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख पलक गांधी, समन्वयक अपर्णा सरवटे, सुचिता करंजवाला, वैशाली गांधी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने झेंड्याला मानवंदना दिली.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे यावेळी बोलताना म्हणाले की, वैविध्यपूर्ण उपक्रम ही चॅलेंजर पब्लिक स्कूलची परंपरा आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढावी यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने कविता गायन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा देशभक्तीपर गीत गायनांचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या स्वातंत्र्यात थोर समाजसुधारक, क्रांतिकारक यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. आज देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना आपण सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व अनुकरण करण्याचा निर्धार करू या. सुरक्षाविषयक सर्व नियमांचे पालन करून व कोरोनापासून मुक्ती मिळवू या, असा संकल्प करू.
या कार्यक्रमासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.