- ओअॅसिस इंग्लिश मिडीअम स्कूल व ज्यूनिअर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन साजरे
न्युज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ११ जाने.) :- मुले ही फुलांसारखी आहेत. त्यांना त्यांचे बालपण उपभोगू द्या. त्यांचेवर अपेक्षांचे ओझे लादून त्यांचे बालपण हिरावू नका, असे प्रतिपादन माजी कॅबिनेट मंत्री. प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी भोसरी येथे व्यक्त केले.
ते शाहू शिक्षण संस्था संचलित ओअॅसिस इंग्लिश मिडीअम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी बोलत होते. यावेळी राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालाच्या संचालिका अॅड. कोमल अजय साळुंखे (ढोबळे), ओअॅसिस इंग्लिश मिडिअम स्कूलचे संचालक अजय साळुंखे, डॉ. अशोककुमार पगारीया, चित्रपट अभिनेते विशाल कोलते, प्रकाश पी. खंदारे, नगरसेविका सुजाताताई पलांडे, यशोदा बोईनवाड, प्रभा शाह, प्रा. धनंजय भिसे, मनोज कांबळे, संजय बोरा, भीमराव गोपनाराण व मुख्याध्यापिका शरली शाबु व बहुसंख्येने पालक उपस्थित होते.
प्रा. ढोबळे पुढे म्हणाले की, आपल्या मुलांचे संरक्षण आपण करावाचे आहे. मुलांसमोर पालकांनी मद्यपान, गुटखा आदि व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. मुले पालकांची कृती अंगीकारत असतात. त्यांच्या संस्कारक्षम वयांवर योग्य ते संस्कार व्हायला पाहिजेत. आपल्या मुलांचे मित्र परिवार पालकांना माहित असायला पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील घराचा किराणा खरेदी करताना, आपल्या मुलांसाठी एक पुस्तक अवश्य खरेदी करत. त्यावेळी बाबासाहेबांना वाचनाची आवड लागल्यामुळे ते देशाची राज्यघटना निर्माण करू शकले.











