- अवघ्या दहा मिनिटात ऑनलाइन सभेचा गाशा गुंडाळला…
- नगरसेवक म्हणतात ‘आम्हाला लाज वाटते नगरसेवक असल्याची’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२१) :- एसीबीने लाचप्रकरणी स्थायी समितीच्या अध्यक्षांसह पाच जणांना अटक केली आहे. याचे पडसाद महापालिकेतील ऑनलाइन सभेत उमटणार होते. मात्र, चर्चा न करताच सत्ताधारी भाजपने ऑनलाइन सभा रेटून नेली. विषयाचे वाचन, उपसूचना आणि मंजुरी असे करताच अवघ्या दहा मिनिटांत २२ विषय मंजूर करत सभेचे कामकाज गुंडाळले आहे.
महापालिका सर्वसाधारण सभेत शुक्रवारी गोंधळ होणार होता. सकाळपासून महापालिका प्रवेशद्वारासमोर विरोधक, सामाजिक संघटनांकडून आंदोलन झाले. दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी महापौर कक्षातून सभा कामकाज सुरू झाले. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सभा सुरु होताच विरोधक स्थायी समिती सभागृहात गेले. महापौरांकडे बोलू देण्याची विनंती केली. परंतु महापौरांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
दोन वाजून ५ मिनिटानी सुरु झालेली सभा २ वाजून १५ मिनिटांनी संपली. सभा संपल्यानंतर विरोधकांनी बोलून न दिल्याबाबत महापौरांकडे जाब विचारला. सभा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सभेतील कामकाज रद्द करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे विरोधकांनी सांगितले. नगरसेवक म्हणून घेण्याची लाज वाटतेय. स्थायी समिती अध्यक्षांना अटक केली असून पोलीस कोठडीत ठेवले हे निदनीय आहे. असे असताना कोणतीही लाज न बाळगता सत्ताधारी भाजपने सभा रेटून नेली. आम्हाला नगरसेवक म्हणून घेण्याची लाज वाटत असल्याचा सताप विरोधकांनी व्यक्त केला. यावेळी महापोर ढोरे म्हणाल्या, ‘स्थायीत सर्वपक्षीय नगरसेवक असतात. मी कोणाच्या दबावाखाली काम करत नाही. आजची सभा नियमाप्रमाणे पार पडली’.
विरोधक नगरसेवकांनी यावेळी आंदोलन केले. या आंदोलनात विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, वैशाली घोडेकर, नाना काटे, भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, मयूर कलाटे, समीर मासूळकर, विनोद नढे, राहुल भोसले, मोरेश्वर भोंडवे, संजय वाबळे, सचिन भोसले, वैशाली काळभोर, उषा वाघेरे, उषा काळे आदी सहभागी झाले होते.


















