- पोलिसांचा अहवाल येताच कारवाईचा आयुक्तांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२१) :- लाच स्वीकारल्याप्रकरणी पिंपरी – चिंचवड महापालिकेचे कर्मचारी व स्थायी सभापती यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. १८) अटक केली आहे. त्यासंदर्भात पोलिसांकडून अहवाल प्राप्त होताच, त्यांच्यावर सेवा निलंबनाची कारवाई केली जाणार आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.२०) स्पष्ट केले.
मंजूर वर्क ऑर्डर देण्यासाठी एका जाहिरात एजन्सी चालकाकडून एक लाख २८ हजार रुपयांची लाच घेताना स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, त्यांचे स्वीय सहायक व मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरिया, संगणक ऑपरेटर राजेंद्र शिंदे व शिपाई अरविंद कांबळे यांना पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली.
महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ५४ नुसार शिस्तभंग केल्यास किंवा इतर गैरवर्तन केल्यास त्यांचे निलंबन केले जाते. त्या नियमानुसार त्या ४ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांच्या अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. अहवाल प्राप्त होताच त्या सर्वांचे सेवानिलंबन केले जाईल, असे पालिकेच्या प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


















