- दोषी आढळल्यास पक्षाकडून कारवाई – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी – चिंचवड स्थायी समिती दालनात (दि.१८) बुधवारी लाचलुचपत विभागाने कारवाई केली. त्या अनुषंगाने या प्रकरणात दोषी आढळल्यास दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.
या तपासकामी स्थायी समिती सदस्यांनी सहकार्य करावे, असे निर्देश भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी दिल्याची माहिती शहर भाजपाचे प्रमुख प्रवक्ते अमोल थोरात यांनी दिली आहे.
भाजप प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेनुसार पिंपरी – चिंचवडच्या प्रभारी आ. माधुरी मिसाळ शुक्रवारी (दि. २०) पिंपरी – चिचवडला भेट दिली. तेथे घडलेल्या प्रकाराबद्दल सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणाबाबत सविस्तर अहवाल त्या मला सादर करतील आणि प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी पोलिस तपासात संपूर्ण सहकार्य करावे, अशी सूचना केली असून या सर्व प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल व या षडयंत्रामागील चेहरा समाजापुढे उघड होईल, असेही प्रदेशाध्यक्ष आ . पाटील यांनी स्पष्ट केले आहे.


















