- टेंडर व बीडसंबंधी कागदपत्रे हस्तगत करण्याची कारवाई सुरूच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२१) :- वर्क ऑर्डरच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी १ लाख १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्थायीच्या कर्मचाऱ्यांना एसीबीने बुधवारी (दि. १८) महापालिका मुख्यालयात रंगेहाथ पकडले होते. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर केले असता आरोपी आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेत आरोपींना दोन दिवसांची सोमवार (दि. २३) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक), राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक ऑपरेटर) आणि अरविंद भिमराव कांबळे, (पद शिपाई) यांना पोलिसांनी गुरुवारी (दि. १९) पहाटे अटक केली होती.
स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांनी मालमत्तेबाबत काहीही माहिती दिली नसून उडवाउडवीची उत्तरे दिली. मालमत्तेबाबत माहिती घेणे आहे. हे एक प्रकारचे मोठे ‘रॅकेट’ असून यात आणखी कोण-कोण सामील आहे. याचा तपास करायचा आहे. आरोपींच्या अंगझडती आणि कार्यालय झडतीत ५ लाख ६८ हजार ५६० रुपये मिळून आले. त्याबाबतचा त्यांनी समाधानकारक खुलासा केला नाही. उडवाउडवीची उत्तरे दिली असून या रकमेबाबत तपास करायचा आहे. राजेंद्र शिंदे यांच्या अंगझडीत सापडलेल्या २४ हजार ४८० रुपयांच्या रमकेबाबत तपास करायचा आहे. टेंडर प्रक्रिया आणि बीड संबंधी कागदपत्रे हस्तगत करण्याची कारवाई सुरु असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायाधीशांपुढे केला आहे.