- कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरु; आयुक्तांचा आदेश..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२१) :- लाच स्वीकारल्याप्रकरणी पिंपरी – चिंचवड महापालिकेचे कर्मचारी व स्थायी सभापती यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. १८) अटक केली आहे. त्यासंदर्भात पोलिसांकडून अहवाल प्राप्त होताच, त्यांच्यावर सेवा निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. दरम्यान स्थायी समिती सभापतींच्या स्वीय सहाय्यकासह चार कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांना पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
मंजूर वर्क ऑर्डर देण्यासाठी एका जाहिरात एजन्सी चालकाकडून एक लाख २८ हजार रुपयांची लाच घेताना स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, त्यांचे स्वीय सहायक व मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरिया, संगणक ऑपरेटर राजेंद्र शिंदे व शिपाई अरविंद कांबळे यांना पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली होती. त्यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
लाच स्वीकारणे हा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ५४ नुसार शिस्तभंग केल्यास किंवा इतर गैरवर्तन केल्यास त्यांचे निलंबन केले जाते. त्या नियमानुसार या चार कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता न ठेवता लोकसेवक म्हणून स्वत:च्या पदाचा, अधिकाराचा दुरुपयोग, गैरवापर करुन गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन केले. महापालिका कर्मचाऱ्यास अशोभनीय ठरेल असे वर्तन केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या गैरवर्तनामुळे महापालिकेची जनमानसातील प्रतिमा भंग झाली. ४८ तासापेक्षा जास्त कालावधीकरिता ते अटकेत आहेत. त्यामुळे महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार ज्ञानेश्वर पिंगळे, विजय चावरिया, राजेंद्र शिंदे आणि अरविंद कांबळे यांना अटकेच्या दिनांकापसून म्हणजेच बुधवार (दि. १८) सेवानिलंबित करण्यात आले. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले आहेत. या आदेशाची त्यांची सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे. या चौघांना निलंबन काळात पहिल्या तीन महिने कालावधीसाठी अर्धवेतनी रजेवर असताना जितके रजा वेतन मिळाले असते.
त्या रजा वेतनाइतकी निर्वाहभत्याची रक्कम देण्यात येईल. तीन महिन्यानंतर मूळ पगाराच्या तीन चतुर्थांश अधिक अर्जित रकमेच्या काळात अनुज्ञेय असलेले भत्ते मिळून होणारी रक्कम उपजिवीका भत्ता म्हणून देण्यात येईल. सेवानिलंबन काळात कोणत्याही ठिकाणी नोकरी, व्यवसाय करता येणार नाही. नोकरी, व्यवसाय केला नसल्याचा दाखला दरमहिन्याच्या २० तारखेच्या आत स्वत:च्या सहीने दिला पाहिजे. सेवानिलंबन काळात कार्यालयात, कार्यालयाच्या आवारात गैरवर्तन केल्याचे आढळून आल्यास पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय पिंपरी राहिल. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडून जाता येणार नसल्याचे आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.











